वाघ्या-मुरळी लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी जेजुरीत १४ जुलै रोजी महामेळावा
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
जेजुरी : भोर येथील वाघ्या-मुरळी परिषद तथा वाघ्या-मुरळी लोककलावंत प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वाघ्या-मुरळी लोककलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी जेजुरी येथे राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व वाघ्या-मुरळी लोककलावंत, जागरण-गोंधळ कलाकार, वाहनचालक व मालक यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. मारोती साठे यांनी केले आहे.
महामेळाव्यात शासनाकडून मंजूर करण्यात आलेले ₹५,००० मानधन तातडीने वितरित करणे, नव्या मानधन योजनेची मुदत वाढविणे, प्रवासासाठी टोलमाफी, रात्रीच्या कार्यक्रमांवरील वेळेची मर्यादा शिथिल करणे, लोककलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण, आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, तसेच वाघ्या-मुरळी लोककलावंतांसाठी जेजुरी येथे सांस्कृतिक भवन उभारणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
याशिवाय पारंपरिक वेशभूषा, वाद्ये व लोककलेचे जतन, धार्मिक परंपरांचा सन्मान, कलाकारांना कार्यक्रमस्थळी संरक्षण आणि शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळावे, अशा विविध मागण्यांचाही या महामेळाव्यात पाठपुरावा करण्यात येणार आहे.
वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मल्ल्हार भक्त आणि लोककलावंतांनी या महामेळाव्यास उपस्थित राहून एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.