दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा वसमत वकील संघाकडून तीव्र निषेध
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथे नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कथित लाठीचार्जचा वसमत वकील संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. या प्रकरणातील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी ता.२४ राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जंतरमंतर येथे विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्याची बाब अत्यंत दुर्दैवी असून, लोकशाही व्यवस्थेला अशा प्रकारच्या घटना शोभणाऱ्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखला जावा आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वसमत वकील संघाने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने संवेदनशीलतेने लक्ष द्यावे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र साखरे, सचिव अँड दिपक मुरुंबेकर, उपाध्यक्ष अॅड. शेख मोहसीन शेख करीमोद्दीन, सहसचिव अॅड. केतनकुमार सारंग, कोषाध्यक्ष अॅड. नाहीद सिद्दीकी, ग्रंथालय सचिव अॅड. विनोद खोते तसेच महिला प्रतिनिधी अॅड. सौ. साक्षी सचिन जोशी यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.