मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुर्गाप्रसाद मिताराम हटवार यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार

Fri 19-Sep-2025,08:26 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार ,शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिक्षक दुर्गाप्रसाद हटवार यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील संत कक्कया मार्ग मनपा हिंदी शाळा क्र. 1 धारावीचे महापौर पुरस्कार पुरस्कर्ते आदर्श शिक्षक दुर्गाप्रसाद मिताराम हटवार यांना २०२४-२५ चा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

दुर्गाप्रसाद मिताराम हटवार हे सालेकसा तालुकातील कावराबाँध रहिवासी आहे. यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व शिक्षणमंत्री दादा भुसे व अन्यमंत्रीगण यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे पुरस्कार देण्यात येईल.सालेकसा तालुकातिल कावराबांध येथे निवास करत घरची परिस्थिती हालाखीची असताना शिक्षण घेऊन आपल्या उपजीविकेसाठी मुंबईत आलेले दुर्गाप्रसाद हटवार मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गोरगरीब मुलांना गेल्या 17 वर्षापासून घडवित आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबर त्यांना सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी त्यांची नाळ जुळलेली आहे. गेल्या सतरा वर्षापासून धारावीतील तळागाळातील विद्यार्थ्यांना आनंदमय शिकवत पवित्र कार्य करीत आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दुर्गाप्रसाद हटवार उपक्रमशील ,शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून ओळखले जातात.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातून त्यांना वर्ष 2020-21मधील मुंबई महापालिकेचा प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दुर्गाप्रसाद मिताराम हटवार यांना शासनाच्या वतीने सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दुर्गाप्रसाद हटवार यांना आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. हटवार यांचे नातेवाईक आणि मित्र,शाळा परिवाराकडून विशेष कौतुक केले जात आहे. दुर्गाप्रसाद हटवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, सदर पुरस्कार स्वरुपात शाल,श्रीफळ, ट्रॉफी,1 लाख रुपये रोख, प्रमाणपत्र देण्यात येईल.पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सालेकसा तालुक्यातील हर्ष होत आहे.आपल्या कामाची जबाबदारी वाढली असेही हटवार म्हणाले.