स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : अट्टल घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना अटक

Tue 04-Nov-2025,08:29 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा – स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक करून तीन घरफोडी व एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹1,53,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सावंगी मेघे पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी सुरज प्रतापसिंग राठोड (वय 32, रा. गजानन नगरी, पालोती रोड, सावंगी मेघे) यांच्या घरात दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याच्या काळात अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. यावरून पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे गुन्हा क्रमांक 830/2025 कलम 305, 331 (2) बी एन एस अंतर्गत नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा मागोवा घेतला. चौकशीत उघड झाले की, आरोपींनी यापूर्वीही सेवाग्राम, वर्धा व रामनगर परिसरात घरफोडीचे गुन्हे केले होते.

दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथक विक्रमशीला नगर परिसरात रवाना झाले. तेथे आरोपी मित्राकडे थांबलेले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत :

1. सुदर्शन गंगाधर वाडेकर (वय 23, रा. सर्कस ग्राउंड, रामनगर)

2. ओम संजय नवले (वय 19, रा. विक्रमशीला नगर, वर्धा)

3. एक विधी संघर्ष बालक

सखोल चौकशीत आरोपींनी सावंगी मेघे हद्दीतील गणेशनगरी, रामनगर जोशी लेआउट, तसेच देवळी हद्दीतील महालक्ष्मी टाऊन येथे चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेला ₹1,53,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उ.नि. प्रकाश लसुंते व त्यांचे सहकारी शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, विकास मुंढे, सुगम चोधरी, शुभम राऊत, अरविंद इंगोले, सुमेध शेंद्रे, राहुल अथवाल, दिनेश बोरकर, अक्षय राऊत यांनी पार पाडली.

गुन्ह्याचा पुढील तपास सावंगी मेघे पोलीस करीत आहेत.