वडसा–गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान मोठा अपघात

Mon 29-Dec-2025,09:20 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली 

गडचिरोली:आरमोरी तालुक्यात सुरू असलेल्या वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान भारत गॅस गोडाऊन जवळ एका मजुराचा जेसीबी मशीनच्या धडकेत गंभीर अपघात झाला. या अपघातात संबंधित मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी त्वरित १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकदा संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे जखमी मजुराला वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाला.

या घटनेनंतर आरमोरी येथील आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आरमोरीतील आरोग्य सेवा झोपली आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत, संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांमध्ये आपत्कालीन सेवा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वैभव सपाटे व नागरिकांनी केली आहे.