बिल्ट पेपरमिल नर्सरीत लोखंडी गेट चोरीचा प्रयत्न,सुरक्षा रक्षकांवर हल्ला
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील बिल्ट पेपरमिलच्या नर्सरी परिसरात लोखंडी साहित्य चोरीचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला करून धमकी दिल्याची खळबळजनक घटना २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
समरबहादुर रामप्रसाद सिंग (५६), रा. पंडित दिनदयाल वार्ड, न्यू कॉलनी, बांबू रोड, बल्लारपूर हे बिल्ट पेपरमिल नर्सरी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, मागील काही दिवसांपासून नर्सरी परिसरातून अज्ञात व्यक्तींमार्फत लोखंडी साहित्य चोरीचे प्रकार सुरू होते.
याबाबत त्यांनी वारंवार कंपनी प्रशासनाला माहिती दिली होती.
२४ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता समरबहादुर सिंग हे नर्सरी परिसरात गस्त घालत असताना गोकुळनगर वार्डातील आदिल खान व त्याच्यासोबत तीन इसम लोखंडी गेट आरीने कापून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरोपींना हटकले असता आदिल खान याने शिवीगाळ करत लोखंडी आरीने पोट फाडून ठार मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपी पंपहाऊसच्या दिशेने गेले. तेथे उपस्थित असलेला सुरक्षा रक्षक अवधेश यादव याने धावत येऊन आरोपी हल्ला करण्यासाठी येत असल्याची माहिती दिली. काही क्षणातच आरोपींनी समरबहादुर सिंग व त्यांचे सहकारी सुरक्षा रक्षक अवधेश यादव, गिरी पात्र व महेश कोट्टी यांच्यावर लोखंडी आरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत आरोपींच्या हातातील आरी हिसकावून खाली पाडली. यावेळी आरोपींनी समरबहादुर सिंग व अवधेश यादव यांना ढकलाबुक्की केली.
घटनेची माहिती तात्काळ पेपरमिलच्या मुख्य गेटवरील सुरक्षा विभागाला देण्यात आली. सुरक्षा रक्षकांची गाडी येत असल्याचे कळताच आरोपींनी पुन्हा धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. जाण्यापूर्वी उद्या भेटू, सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी बल्लारपूर पोलीसांनी आरोपी आदिल खान, भोंदया, आकाश व मच्छी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३२९(३), २९६, ३०७, ११५(२), ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण करीत आहेत.
या घटनेमुळे पेपरमिल परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.