सालोड येथे भव्य लकी ड्रॉ जाहीर सोहळा संपन्न
नावेद पठाण मुख्य संपादक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचा लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम
सालोड (हिरापूर): ग्रामपंचायत सालोड (हिरापूर) येथे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत भव्य लकी ड्रॉ जाहीर सोडत कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमोल कन्नाके होते.
कार्यक्रमास उपसरपंच आशिष कुचेवार, भीमराव मुते, रामराव वांदिले, तंटामुक्ती अध्यक्ष संजय मेहत्रे, विजय येरेकर, मधुकर देवतळे तसेच ग्रामपंचायत अधिकारी देवर्षी बोबडे उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविकात ग्रामपंचायत अधिकारी देवर्षी बोबडे यांनी अभियानातील मुख्य सात घटकांची माहिती देत ग्रामपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात सरपंच अमोल कन्नाके यांनी करवसुली योजनेअंतर्गत लकी ड्रॉ जाहीर सोडतीची भूमिका स्पष्ट करून नागरिकांनी नियमित करभरणा करण्याचे आवाहन केले. उपसरपंच आशिष कुचेवार यांनी लोकसहभागातून जमा झालेल्या बक्षिसांची माहिती व योजनेच्या अटी-शर्ती स्पष्ट केल्या.
लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून लकी ड्रॉ सोडत पार पडली. प्रथम बक्षीस एलईडी टीव्ही, द्वितीय स्मार्टफोन, तृतीय सायकल, चतुर्थ शिलाई मशीन, पंचम मिक्सर, षष्ठ कुकर, सप्तम प्रेस, अष्टम टेबल फॅन, नवम भांडी संच, दशम बाथरूम सेट व अकरावे सिलिंग फॅन देण्यात आले. यासह ५१ प्रोत्साहनपर बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सर्व बक्षिसे लोकसहभागातून मिळाल्याचे विशेष.
कार्यक्रमाचे संचालन संदीप रघटाटे यांनी केले, तर आभार संजीव वाघ यांनी मानले. गावाच्या शाश्वत प्रगतीसाठी नियमित करभरणा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी देवर्षी बोबडे यांनी केले.