पालकमंत्री पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त नालवाडीत भव्य मोफत आरोग्य शिबिर
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा:वर्धा दिनांक : १२ जानेवारी २०२६ वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त दत्ता मेघे विचार मंच व वरुण पांडे मित्रपरिवाराच्या वतीने नालवाडी ग्रामपंचायतीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नालवाडी झेडपी सर्कलसह परिसरातील नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या आरोग्य शिबिरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील तज्ज्ञ डॉक्टरांची चमू उपस्थित होती. शिबिरात नेत्र तपासणी, अस्थिरोग, रक्तदाब व मधुमेह तपासणी, स्त्रीरोग, बालरोग तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवा मोफत देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ भाजप नेते गुंडू कावळे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान माजी खासदार रामदासजी तडस यांनी भूषविले.
शिबिरादरम्यान मोतिबिंदूग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यात आली असून संबंधित रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प आयोजक वरुण पांडे यांनी यावेळी जाहीर केला. “मोतिबिंदूमुक्त वर्धा जिल्हा” ही पालकमंत्री मा. पंकज भोयर यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मत वरुण पांडे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात माजी खासदार रामदास तडस म्हणाले, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हे सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. वरुण पांडे यांसारख्या तरुण नेतृत्वाची आज समाजाला नितांत गरज आहे.”
उद्घाटक गुंडूभाऊ कावळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक असून अशा उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना मोठा लाभ होतो. कमी वयातच वरुण पांडे समाजहितासाठी सातत्याने कार्य करीत असून पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्तही ते स्वप्रेरणेने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.” त्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नितीन कवाडे (भाजपा वर्धा तालुका अध्यक्ष), नरेंद्र पाटील (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – गवई), विलासजी आगे (गटनेते, भाजपा नगर परिषद वर्धा), चेतना कांबळे (सचिव, भाजपा वर्धा जिल्हा), गोकुल पांडे (प्रधान संपादक, रिपब्लिकन समाज व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – गवई), रविंद्र उर्फ बंटी गोसावी (माजी नगरसेवक), दिनेश वरटकर (महामंत्री, भाजपा), चंदाताई सयाम (माजी पंचायत समिती सदस्य, नालवाडी), नरेश रुद्रकार, किशोर कुहिकर (माजी ग्रामपंचायत सदस्य, नालवाडी), राजू टिपले (माजी ग्रामपंचायत सदस्य, मसाळा), निहाल पांडे (संस्थापक अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज), तुषार देवढे, सुनील पाटील (शक्ती केंद्र प्रमुख, नालवाडी), धीरज जनबंधु, सुमित नाईक, अमोल येडनुत्तलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम राऊत, प्रफुल्ल बनसोड, सूरज रायकवार व प्रवीण पाथरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ नालवाडी, मसाळा व परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला.