गोंडपिपरी–बोरगाव मार्गावर भीषण अपघात : ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : गोंडपिपरी –बोरगाव मार्गावर सोमवारी (१३) सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ऑटोमधील प्रवासी करण आत्राम (२६), रा. चेक बेरडी यांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक सौरभ पिंपळकर रा. चेक, बल्लारपूर हा गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोरगाव येथून गोंडपिपरीकडे येणारा ऑटो क्रं. एमएच ३४ बीएच २३७९ मध्ये दोन प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने बोरगावकडे भरधाव वेगाने जाणारी दुचाकी क्रं. एमएच ३४ बीएक्स १२४९ बोरकुटे यांच्या शेताजवळील वळणावर ऑटोला जोरदार धडकली.
धडकेचा जोर इतका होता की करण आत्राम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार सौरभ पिंपळकर गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्यासह प्राथमिक तपास अधिकारी देविदास सुरपाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
या अपघातामुळे काही काळ गोंडपिपरी–बोरगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.