खेडूले कुणबी समाजाच्या हळदीकुंकू कार्यक्रमात नृत्य-गीतांची रेलचेल
जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:खेडूले कुणबी समाज जीवनमूल्य विकास संस्था, आरमोरी यांच्या वतीने श्री दत्त मंदिर, बर्डी येथे महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजाचे कुलदैवत संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांनी समाजप्रबोधनपर मार्गदर्शन केले. हळदीकुंकू कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या विनोदी चुटकुल्यांनी उपस्थित महिलांना मनसोक्त हसवले. त्यांना रेवती दोनाडकर व राजश्री राऊत यांनी योग्य साथ दिली. तसेच उषा ठाकरे, मिनाक्षी राऊत, वर्षा चौधरी व सानिका राऊत यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमात अंधश्रद्धा, अन्याय व अत्याचाराविरोधातील संदेश देणारी मार्गदर्शनपर गीतेही सादर करण्यात आली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या भावनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाण म्हणून झाडे लावण्यासाठी कुंड्यांचे वाटप उखाण्यांसह करण्यात आले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी मंजुषा दोनाडकर, पुष्पा दिवटे, मेघा बुराडे, लता राऊत, देवयानी कुथे आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास शीतल नखाते, मंदा राऊत, भारती पत्रे, लता पिलारे, दीपा दिवटे, माया बगमारे, दीप्ती ठाकरे, प्रतिमा राऊत, वैशाली प्रधान, विजया बांडे, रोशनी मैंद, सुजाता दोनाडकर, वसुधा राऊत, संगीता माकडे, रेखा बुल्ले, रजनी प्रधान, शीतल प्रधान, कल्पना चौधरी, शीतल खरकाटे, स्नेहल दोनाडकर, सुलभा दोनाडकर, मंगला दोनाडकर, ममता दोनाडकर आदी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक ऐक्य व संस्कृतीचे दर्शन घडले.