कराटे खेळाडूंचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
मुख्य संपादक नावेद पठाण वर्धा
बोरगाव (मेघे) | खेळाडूंच्या यशामागे धैर्य, एकाग्रता, सातत्यपूर्ण परिश्रम व आत्मविश्वास यांचा सुरेख संगम असतो. त्यासोबतच वरिष्ठ खेळाडू व प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन त्यांच्या यशात मोलाचे ठरते. समाजात महिलांना अनेकदा अपमान व असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आत्मसन्मान व आत्मसुरक्षेसाठी पालकांनी आपल्या मुलींना कराटेसारख्या खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन अंबिका सोशल फाउंडेशन, वर्धा जिल्ह्याच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमिरे यांनी केले.
त्या गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता धर्म कॉम्प्लेक्स, हिंगणघाट रोड, बोरगाव (मेघे), वर्धा येथे स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत स्पोर्ट कराटे असोसिएशन, वर्धा जिल्ह्याच्या वतीने आयोजित कराटे किट, बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक व ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सतीश इखार, सामाजिक कार्यकर्ते मनोज तरारे उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे उपस्थित होते.
याशिवाय जिल्हा सहसचिव हरीश पाटील, संचालक व दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, गॅरंटी इंग्लिश स्पीकिंगचे संचालक शाम पटवा, संस्थेचे सभासद निखिल सातपुते, प्रवीण पेठे, उमेश चौधरी, सुनील चंदनखेडे, महिला संचालिका हेमलताताई काळबांडे, कार्यक्रमाचे निमंत्रक स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशनचे महाराष्ट्र ब्रँच ॲडव्हायझर सेन्साई चेतन जाधव, आयोजक रामनगर शाखाप्रमुख सेन्साई पूजा गोसटकर, कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय पंच सेन्साई वाणी साहू आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
भारताला जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करायची असल्यास जिल्हा पातळीवरही विशेष प्रयत्नांची गरज आहे. कराटे खेळाच्या विकासासाठी शिहान मंगेश भोंगाडे सातत्याने कार्यरत असल्याचे मत उद्घाटक इमरान राही यांनी व्यक्त केले.
मंचावरील मान्यवरांच्या हस्ते स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशनच्या त्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानक असलेल्या आरावाझा कंपनीचे कराटे किट प्रदान करण्यात आले, ज्यांनी शासनमान्य आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय आंतरशालेय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चॅम्पियन टीमचे कॅप्टन सेन्साई कार्तिक भगत, शुभम राखडे, सिद्धार्थ गजभिये, पियुष हावलदार, भार्गव खेवले, अनिकेत वाघमारे, जानवी नांदुरकर, रुजान बाघमोरे, देवांशू लाखे आदींनी अथक परिश्रम घेतले.