गांजा तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Fri 23-Jan-2026,01:26 AM IST -07:00
Beach Activities

गांजा तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

१ किलोहून अधिक गांजासह १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त**

वर्धा | अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक वर्धा मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्यानंतर, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करीविरोधात धडक मोहीम राबविली.

दि. २२ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाने पोलीस स्टेशन समुद्रपूर हद्दीतील मौजा जाम, वॉर्ड क्रमांक ३ येथील सचिन भगवानजी सहारे याच्या राहत्या घरी छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी सचिन सहारे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार गांजाची विक्री करताना रंगेहाथ आढळून आले.

त्यांच्या ताब्यातून १ किलो ०२७ ग्रॅम गांजा, सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ मोपेड (क्र. MH-34 BW-9547), तसेच २ मोबाईल फोन असा एकूण १,५५,५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी, त्याचा अल्पवयीन साथीदार व गांजा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं. अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले व अभिषेक नाईक यांचा सहभाग होता.