अवैध दारू तस्करीवर एलसीबीची धडक कारवाई १२.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), वर्धा यांनी अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत देशी व विदेशी दारू, बिअर कॅन तसेच वाहन असा एकूण १२ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की मुकेश राधलालजी जायसवाल (वय ३९, रा. वार्ड क्र. ०३, गार्डन चौक, कलंब, जि. यवतमाळ) हा आपल्या साथीदारासह पांढऱ्या रंगाच्या इकोस्पोर्ट कार (MH-12 NU-3133) मधून अवैधरित्या दारू वाहतूक करून विक्रीसाठी नेत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थनगर, बोरगाव (मेघे) परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
संशयित वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी ते थांबवले असता चालक मुकेश जायसवाल याला ताब्यात घेण्यात आले, तर त्याचा साथीदार पारीकेत खडसे (रा. हनुमान नगर, बोरगाव मेघे) हा घटनास्थळावरून फरार झाला.
वाहनाची झडती घेतली असता देशी व विदेशी दारू व बिअरचे १६ पेटे, किंमत २,२३,२०० रुपये, तसेच इकोस्पोर्ट कार, किंमत १० लाख रुपये, असा एकूण १२,२३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात सदर दारू ही सदानंद शेडे (रा. कलंब, जि. अमरावती) याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी चंद्रकांत बुरंगे, अमर लाखे, भूषण निघोट, अमोल नगराळे, मंगेश चाबरे व सुमेध शेंद्रे यांनी केली.