वर्धेत राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न,शास्त्रीय संगीत हे दैवी विज्ञान – सुनील बुरांडे
वर्धेत राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न
शास्त्रीय संगीत हे दैवी विज्ञान – सुनील बुरांडे
वर्धा | प्रतिनिधी :
भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास प्राचीन व समृद्ध असून त्याची मुळे वैदिक काळाशी जोडलेली आहेत. गायन, वादन व नृत्य या तिन्ही कलांचा समन्वय म्हणजेच भारतीय शास्त्रीय संगीत असून, ते केवळ कलात्मक अभिव्यक्ती नसून एक दैवी विज्ञान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी सुनील बुरांडे यांनी केले.
ते सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय व गुरुवर्य सुरेश चौधरी स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी डॉ. रंगराव राठोड, रवी खाडे, प्रा. विकास काळे, रणजीत इंगोले, उषा फाले, दामोदर राऊत, प्राचार्य जयश्री कोटगीरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही होते. प्रमुख अतिथी म्हणून मोहन बाबू अग्रवाल, गणेश अतकर, विलास कुळकर्णी, सुरेश पट्टेवार उपस्थित होते. संगीत आत्म्याच्या सूक्ष्म भावनांना स्पर्श करते, असे मत इमरान राही यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पटेवार, सूत्रसंचालन स्मिता पडोळे व वनिता धामंदे, तर आभार यशवंत पलेरिया यांनी मानले.
स्पर्धेतील विजेते :
प्रथम पुरस्कार (₹10,000 व स्मृतिचिन्ह) शिवम शर्मा (अकोला),
द्वितीय पुरस्कार (₹7,000) वैष्णवी केरळे (भुसावळ),
तृतीय पुरस्कार (₹5,000) गरिमा शेजाळ (चंद्रपूर) हिने पटकावला.
प्रोत्साहनपर पुरस्कार सानिका बोभाटे (वर्धा), हर्षदा गवस्ती (भद्रावती), रिद्धिमा शेजाळे, जानवी निमजे व आरोही धीरण यांना देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण हिंडोल पेंडसे (नागपूर) व केतकी कुलकर्णी (वर्धा) यांनी केले.
या प्रसंगी १०३ वर्षीय ह.भ.प. दशरथजी चंदनखेडे यांना जीवनगौरव, तर शंकर तिखे व शिवाजी चवरे यांना संगीत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरणानंतर प्रसिद्ध गझल गायक प्रसन्न जोशी (नागपूर) यांच्या गझल गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.