म.न.पा. सत्तापक्ष नेते नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांना व इतर सात आरोपींना जामीन मंजूर
म. न. पा.सत्ता पक्ष नेता नरेंद्र बाल्या बोरकर व इतर सात आरोपीना जामीन मंजूर
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी श्री एन. बी. पाटील यांनी नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांच्यासह इतर सात आरोपींना जामीन मंजूर करून त्यांच्याविरुद्ध काढण्यात आलेले अटक वॉरंट रद्द केले.
या प्रकरणात आरोपींमध्ये दत्तात्रय बारस्कर, सुरेश हाडगे, गणेश मौंदेकर, विजय शेंद्रे, मनोज झाडे, राजेश उराडे आणि राजकुमार बोन्द्रे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 341, 336, 283, 188, 114 व 34 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 135 आणि ध्वनी प्रदूषण कायदा कलम 5(अ) अंतर्गत लकडगंज पोलीस ठाण्यात 2019 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
आरोपींनी विनापरवानगी दहीहंडीचे आयोजन करून उच्च ध्वनीमध्ये डीजे वाजवून सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून 2021 मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
तथापि, आरोपी न्यायालयात हजर झाले नव्हते आणि त्यांनी जामीनही घेतला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.
आरोपींच्यावतीने अॅड. वासुदेव कापसे यांनी न्यायालयात बाजू मांडत सर्व आरोप राजकीय द्वेषातून लावण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रत्येक आरोपीला 15,000 रुपयांच्या जातमुचलकीवर जामीन मंजूर केला आणि त्यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द केले.
या प्रकरणात आरोपींच्यावतीने अॅड. वासुदेव कापसे यांना अॅड. हेमंत मदनकर, अॅड. पंकज समुद्रे आणि अॅड. हर्षा डोंगरे यांनी सहकार्य केले.