हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अवैध रेती उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी – अश्विन तावाडे

Mon 16-Mar-2026,09:58 PM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अवैध रेती उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी – अश्विन तावाडे

अब्दुल कदीर बक्श हिंगणघाट 

हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी कायदेशीर तसेच बेकायदेशीर रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी उमेदवार अश्विन तावाडे यांनी केली आहे.

अब्दुल कदीर बख्श यांनी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट तसेच तहसीलदार, हिंगणघाट यांना निवेदन देऊन विविध मागण्या मांडल्या आहेत.

भारतीय संविधानाच्या कलम 48(क) नुसार पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. मात्र नदीपात्रात JCB आणि पोकलंडच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे निर्माण होत आहेत, तसेच परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई आणि दूषित पाण्याचा धोका वाढला आहे. याशिवाय रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

अलीकडेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील रेती घाट परिसरात घडलेल्या हत्या प्रकरणाची चर्चा राज्यातील दोन्ही उच्च सदनांमध्ये — विधानसभा व विधानपरिषदेत — झाली असून या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व रेती घाटांचा तात्काळ आढावा घेणे, सूर्यास्तानंतर कामकाज बंद करणे, रेती घाट व नदी परिसरात CCTV कॅमेरे बसवून त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण तहसील कार्यालयात उपलब्ध करणे, तसेच प्रत्येक घाटावर महसूल विभागाचा कर्मचारी आणि पोलीस शिपाई कायमस्वरूपी तैनात करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच JCB आणि पोकलंडच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करून होणारा अवैध रेती उपसा तात्काळ बंद करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि रेती घाट लिलाव प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या मागण्यांवर ठोस कारवाई करावी, अन्यथा पर्यावरण संरक्षण आणि जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अश्विन तावाडे यांनी दिला आहे. तसेच रेती माफियांशी संगनमत करणाऱ्या प्रशासनातील व्यक्तींविरोधात स्ट्रिंग ऑपरेशन करून त्यांचे कृत्य जनतेसमोर उघड करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.