बल्लारपूर शहरात अतिक्रमण विरुद्ध नगर परिषदेची मोठी कारवाई बुलडोजर मोहीमेमुळे खळबळ

Wed 08-Apr-2026,01:28 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर : शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर आळा घालण्यासाठी नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणात बुलडोजर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील प्रमुख भागांमध्ये खळबळ उडाली असून अनेक ठिकाणांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली.

नगर परिषद प्रशासनाने सुभाष टॉकीज परिसर, बसस्थानकासमोरील भाग, बँक परिसर, गोल पुलिया परिसर तसेच भाजी मंडई परिसरातील रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली. या कारवाईदरम्यान फूटपाथ, रस्ते व सार्वजनिक जागांवर उभारलेले फूड स्टॉल, तात्पुरत्या शेड्स, भंगार दुकाने व इतर बांधकामांवर बुलडोजर चालवण्यात आला.

माहितीनुसार, अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत होता. नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत होत्या तसेच वाहनतळाच्या अभावामुळे रस्त्यांवरच वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढत होती.

दरम्यान, नगर परिषदेकडून यापूर्वीच संबंधित दुकानदारांना नोटीस देऊन अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी आदेशांचे पालन न झाल्याने प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग अवलंबला.

नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, शहरातील अतिक्रमणाविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईमुळे शहरातील वाहतूक व पादचारी व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला असून १५ दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.

सदर अतिक्रमण मोहीम मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या नेतृत्वात उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, योजना अधिकारी प्राप्ती मून, अर्चना मेडपल्लीवार, स्वास्थ निरीक्षक शब्बीर अली सह नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.