जीवन प्रमाणपत्रासोबत उत्पन्न दाखल्याची सक्ती,निराधार लाभार्थ्यांसमोर गंभीर प्रशासकीय अडथळे

Wed 08-Apr-2026,01:23 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : राज्यातील दिव्यांग, वृद्ध व विधवा पेन्शनधारकांना दरवर्षी हयात (जीवन) प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असताना, मागील काही वर्षांपासून या प्रक्रियेत उत्पन्न दाखल्याची अट लादण्यात आल्याने निराधार लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.पूर्वी केवळ जीवन प्रमाणपत्र सादर करून लाभ मिळत असताना, आता त्यासोबत उत्पन्न दाखला सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, हा दाखला मिळविण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने अनेक लाभार्थ्यांना वारंवार तहसील व तलाठी कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत. यामुळे दिव्यांग व वृद्ध नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.दरवर्षी बदलणारे नियम आणि प्रशासनातील स्पष्टतेचा अभाव यामुळे नेमके कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर, दिव्यांग हक्क संघर्ष समितीच्या सदस्यांनी मंगळवारी बल्लारपूर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तहसीलदार अनुपस्थित असल्याने प्रतिनिधींना नायब तहसीलदार अजय मल्लेलवार यांना निवेदन सादर करावे लागले.निवेदनात, जर शासनाने उत्पन्न दाखला अनिवार्य केला असेल, तर तो लाभार्थ्यांना सहज व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, दिव्यांग व इतर निराधार लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयांचे चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी सोपी प्रक्रिया राबवावी, अशीही मागणी करण्यात आली.

या वेळी विकास भगत, दिनेश पटेल, इरशाद शेख, घनश्याम गेडाम, मधुकर उमरे, सुरेश केशकर, प्रिया त्रिपाठी, रूपा राठोड, संगीता गायकवाड, गिरजा तसेच दिव्यांग नेते आसिफ हुसेन शेख आदी उपस्थित होते.