कारंजात ठाणेदार प्रल्हाद मदन यांचा ‘ॲक्शन प्लॅन’; घरफोडींवर लगाम घालण्यासाठी पोलिस-नागरिकांची संयुक्त मोहीम

Sat 04-Apr-2026,11:50 PM IST -07:00
Beach Activities

कारंजात ठाणेदार प्रल्हाद मदन यांचा ‘ॲक्शन प्लॅन’; घरफोडींवर लगाम घालण्यासाठी पोलिस-नागरिकांची संयुक्त मोहीम

( नावेद पठाण मुख्य संपादक सावंगी मेघे )

कारंजा शहरातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये अलीकडे वाढलेल्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी नाविन्यपूर्ण व नियोजनबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’ राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये या योजनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

गेल्या आठवड्यात वॉर्ड १६ मध्ये घरफोडीच्या काही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर नागरिकांनी एकत्र येत पोलीस स्टेशनला निवेदन देऊन रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली. त्यानुसार ठाणेदार मदन यांनी नागरिकांशी संवाद साधून हा अभिनव प्लॅन तयार केला.

‘ॲक्शन प्लॅन’ची वैशिष्ट्ये:

वॉर्ड १६ मधील नागरिकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, ठाणेदार स्वतः त्यात सहभागी झाले आहेत. जे नागरिक घर बंद करून बाहेरगावी जातात, त्यांनी आपल्या घराचे लोकेशन व मोबाईल क्रमांक या ग्रुपवर शेअर करायचे आहे. त्यानुसार रात्री गस्तीवरील पोलीस पथक त्या घरांची पाहणी करून फोटो काढून संबंधित घरमालकाला पाठवतात. त्यामुळे बंद घरांवर विशेष लक्ष ठेवणे शक्य होत आहे.

याशिवाय, प्रत्येक संवेदनशील वॉर्डमध्ये दोन पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेत दररोज ५ ते ६ जण रात्री १२ ते ४ या वेळेत आळीपाळीने गस्त घालत पोलिसांना सहकार्य सुरू केले आहे. नागरिकांनी आपली दुचाकी वाहने रात्री घराच्या अंगणात ठेवावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ठाणेदार मदन यांनी यापूर्वी खामगाव व मूर्तिजापूर येथेही अशी योजना यशस्वीपणे राबविल्याचे सांगितले. सध्या हा प्रयोग वॉर्ड १६ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून, लवकरच शहरातील इतर संवेदनशील भागातही तो राबविण्यात येणार आहे.

संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई केली जात आहे.

ठाणेदार प्रल्हाद मदन म्हणाले, “नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण ही आमची प्राथमिकता आहे. पोलिसांचा बंदोबस्त चोख आहेच, मात्र नागरिकांनीही घर बंद करून बाहेर जाताना पोलिसांना माहिती द्यावी. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.”

दरम्यान, पोलिसांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, वाढलेल्या गस्तीमुळे घरफोडीच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, या मोहिमेला ‘झिरो टॉलरन्स’ धोरण म्हणून राबविण्यात येत असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.