दुर्गापूरमध्ये युवकाची थरारक हत्या,क्षुल्लक वादातून उफाळली जीवघेणी हिंसा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
चंद्रपूर : दुर्गापूर परिसरात घडलेल्या एका अमानुष आणि थरारक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. किरकोळ वादातून थेट जीव घेणाऱ्या हिंसक प्रवृत्तीचा हा धक्कादायक नमुना समोर आला असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, यश हरिदास फाले (२५), रा. कोंडी वॉर्ड नं. ५, दुर्गापूर या तरुणाची प्रफुल महाराणे याने निर्घृणपणे हत्या केली. आरोपी प्रफुल महाराणे हा कोयना गेट परिसरात नाश्ता व लस्सीचे दुकान चालवत असल्याचे उघड झाले आहे.
यश आणि प्रफुल यांच्यात बुधवारपासून सुरू असलेला वाद गुरुवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण स्वरूप धारण करत थेट रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला.
संतापाच्या भरात आरोपीने बर्फाची लादी तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार ‘नोकुली’ हत्याराने यशच्या पोटात जोरदार वार केला. या प्राणघातक हल्ल्यात यश गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत आरोपी प्रफुल महाराणे हाही जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या ताब्यात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणाचा तपास दुर्गापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक गौरव कायदेपंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात तीव्र भीतीचे सावट पसरले असून, क्षुल्लक कारणांवरून वाढणारी हिंसक मानसिकता आणि कायद्याचा धाक कमी होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.