महिलांनी स्वतःच्या मर्यादा ओलांडून स्वतंत्र ओळख निर्माण करावी – डॉ. धनंजय सोनटक्के
महिलांनी स्वतःच्या मर्यादा ओलांडून स्वतंत्र ओळख निर्माण करावी – डॉ. धनंजय सोनटक्के
अंनिस वर्धा तर्फे आयोजित ‘भरारी’ दोन दिवसीय महिला व युवती शिबिराचा उत्साहात समारोप
वर्धा | विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण
वर्धा : समाजाने ठरवून दिलेल्या सुरक्षित मर्यादांमध्ये राहणे सोपे वाटते; मात्र “लोक काय म्हणतील” या विचारातून बाहेर पडून महिलांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), वर्धा यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘भरारी’ महिला व युवती शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर बेलखोडे होते.
पर्यावरण संवर्धनात महिलांची महत्त्वाची भूमिका – मुरलीधर बेलखोडे
अध्यक्षीय भाषणात मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले की, समाजाच्या अस्तित्वात महिलांचा व युवतींचा मोलाचा वाटा आहे. कुटुंब व समाजाचा समतोल राखत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही महिलांनी पार पाडली पाहिजे, जेणेकरून पुढील पिढी सुरक्षित राहील.
दोन दिवस उत्साह, आनंद आणि अभिव्यक्तीचे
‘भरारी’ शिबिराचे हे चौथे वर्ष असून यामध्ये ३८ महिला व युवतींनी सहभाग घेतला. शिबिरात विविध खेळ, प्रेरणादायी सत्रे, ‘जगू या आनंदे’, ‘मला माझा अभिमान आहे’ यांसारखे उपक्रम, कॅटवॉकद्वारे परिचय सत्र तसेच प्रेरणादायी माहितीपट दाखविण्यात आले. यावर्षी सासू–सून जोडीनेही विशेष सहभाग घेतला.
भावनांना मिळाला मुक्त वाव
शिबिरादरम्यान अनेक महिला भावूक झाल्या. घरगुती जबाबदाऱ्या व तणावापासून दूर हे दोन दिवस त्यांना माहेरपणाचा अनुभव देऊन गेले, असे त्यांनी सांगितले. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी हे शिबिर प्रभावी व्यासपीठ ठरले.
सहकार्य आणि आयोजन
शिबिराच्या यशस्वी आयोजनात कविता राठोड यांचे विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना सातव यांनी केले, प्रास्ताविक डॉ. माधुरी झाडे यांनी मांडले. पाहुण्यांचा परिचय प्राची काकडे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन पूजा सावरकर यांनी केले. आदिती व त्यांच्या समूहाने प्रेरणादायी गीतांद्वारे वातावरण उत्साही ठेवले.
या उपक्रमात सारिका डेहनकर, पंकजा गादेवार, प्रतिभा ठाकूर, कविता लोहट, मंजुषा देशमुख, आदिती धोपटे, द्वारकाताई इमडवार, कुंदा वैद्य, प्रितेश म्हैसकर, अरुण भोसले यांच्यासह अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.