वुशू खेळाडूंचा वर्ध्यात गौरव सोहळा; शिस्त व बचावकौशल्यावर भर – मोहन अग्रवाल

Sat 04-Apr-2026,11:32 PM IST -07:00
Beach Activities

वुशू खेळाडूंचा वर्ध्यात गौरव सोहळा; शिस्त व बचावकौशल्यावर भर – मोहन अग्रवाल

( नावेद पठाण मुख्य संपादक सावंगी मेघे )

वर्धा | वर्धा येथे वुशू स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने वुशू खेळाडूंचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी वुशू हा शिस्त, बचावात्मक कौशल्य आणि मानसिक एकाग्रता वाढवणारा आंतरराष्ट्रीय खेळ असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल यांनी केले.

ते ४ एप्रिल रोजी संत गजानन महाराज देवस्थानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. वुशू खेळामुळे शरीराची लवचिकता, ताकद व संतुलन वाढते, तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक खेळ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संरक्षक इमरान राही, शायनिंग स्टार स्कूलचे संचालक समीर शेंडे, एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे पवन तिजारे, संस्थेचे सचिव नानाजी पहाडे, कराटे असोसिएशनचे सचिव मंगेश भोंगाडे व वुशू असोसिएशनचे अध्यक्ष निलेश राऊत उपस्थित होते.

इमरान राही यांनी खेळामुळे मुलांमध्ये संवादकौशल्य व सामाजिक जाणीव विकसित होते, असे सांगितले.

नुकत्याच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात झालेल्या वुशू स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. कु. स्नेहा मडकाम (देवळी) हिने सांडा प्रकारात प्रथम स्थान, तर अभिषेक सोनवणे यांनी तावलू प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून जम्मू येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच प्रेम वाघमारे यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दलही त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सर्व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रणय विटणकर यांनी केली. संचालन कु. रुचिका टेंबरे यांनी तर आभार प्रदर्शन सेन्साई समीर साहू यांनी केले.