वर्धा शहर गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; अवैध विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश
वर्धा शहर गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; अवैध विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध विदेशी दारू विक्रीविरोधात धडक कारवाई करत पंकज धांदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शोध पथकातील अंमलदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे आणि रंजीत बुरसे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, पावडे चौक, बॅचलर रोड, वर्धा येथे राहणारा पंकज धांदे हा आपल्या घरी विदेशी दारू साठवून चोरटी विक्री करत आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सोनूकुमार बानोत, पोलीस अंमलदार नवनीत वानखेडे तसेच इतर पथक सदस्यांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान पंकज धांदेच्या घरातील पहिल्या खोलीत काही ग्राहक लाकडी बाकांवर बसून प्लास्टिक स्टूलवर ठेवलेल्या ग्लासमधून दारू पिताना आढळले. आरोपी ग्राहकांना विदेशी दारू, पाणी व खाण्याची व्यवस्था करून देताना दिसून आला.
पोलिसांनी पंचासमक्ष आरोपी व उपस्थित ग्राहकांची नावे व पत्ते नोंदवून घरझडती घेतली असता विविध कंपन्यांची विदेशी दारू तसेच रिकाम्या बाटल्या, एक मोबाईल, लाकडी टेबल, प्लास्टिक स्टूल, ग्लास आदी साहित्य असा एकूण सुमारे १०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पंकज धांदे व इतरांविरुद्ध वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ३४८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई), ७७(अ), ८३, ६८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली. या मोहिमेत प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, रंजीत बुरसे, नवनीत वानखेडे आणि अमोल साळवन यांनी सक्रिय सहभाग घेतला.