वसमत शहरात नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहिम सुरू
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली वसमत येथील नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी दुकाने, हातगाड्या व फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र, या कारवाईमुळे व्यापारी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. “आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येईल,” असा सवाल व्यापाऱ्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला.
काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली अडचण मांडत कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मोहिम सुरू ठेवली.
नगर परिषदेकडून शहर सुशोभीकरण आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या मोहिमेमुळे पुढील काही दिवस शहरातील परिस्थितीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.