आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न; सलोखा व शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

Mon 25-May-2026,11:20 PM IST -07:00
Beach Activities

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न; सलोखा व शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

वर्धा तालुका प्रतिनिधी | इरशाद शहा

वर्धा : आगामी २७ मे २०२६ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद (ईद-उल-अजहा) सण साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्व समाजघटकांमध्ये धार्मिक सलोखा व शांतता कायम राहावी या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा शांतता समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

ही बैठक वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस जिल्ह्यातील विविध मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार व्ही.सी.द्वारे बैठकीला सहभागी झाले होते.

यावेळी बकरी ईदचा सण नेहमीप्रमाणे उत्साहात, शांततेत आणि सर्वधर्मसमभावाच्या भावनेतून साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच समाजकंटकांना थारा देऊ नये, असेही सांगण्यात आले.

कुर्बानीच्या वेळी शासन व न्यायालयाने दिलेल्या नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आदी माध्यमांवर आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारी कोणतीही पोस्ट, संदेश अथवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. पोलीस सायबर सेलचे सोशल मीडियावर बारीक लक्ष असून, अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

सणाच्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांना कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

वर्धा जिल्ह्याला शांतता आणि सलोख्याची समृद्ध परंपरा लाभलेली असून, आगामी बकरी ईदचा सण सर्वांनी एकोप्याने व परस्परांच्या भावनांचा आदर राखत शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.