विश्वस्तरीय लेखनस्पर्धेत कृषी कवी रंगनाथ तालवटकर प्रथम
 
                                    
                                विलास लभाने ( गिरड )
(गीतरचना लेखनप्रकारात प्रथम क्रमांकाची हॅट्रिक)
समुद्रपूर :- अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने बळीराजा डॉट कॉम आयोजित प्रकारनिहाय लेखनस्पर्धेत तालुक्यातील चिखली (कोरा) येथिल प्रसिध्द कृषीकवि रंगनाथ तालवटकर यांनी विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४ च्या स्पर्धेत भाग घेतला. प्रकारनिहाय लेखनस्पर्धेतील गीतरचना विभागात शेतमालाचे भाव विषय असलेल्या "कधी जागेल सरकार" या गितरचनेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नुकत्याच लागलेल्या निकालात जाहीर झाले आहे.
बळीराजा डॉट कॉम वर ऑनलाईन विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा ही अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य सम्मेलन चळवळीने आयोजीत केली होती.त्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील व विश्वभरातील मराठी साहित्यीकांनी सहभाग घेतला होता.सलग सातव्यांदा समुद्रपूर तालुक्याला साहित्यक्षेत्रात मान मिळवून देणारे कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कार्याची स्तुती सगळीकडेच होतांना दिसत आहे. २०१७ ला पोवाडा लिखाणात प्रथम, २०१८ ला 'धोरण' या गितरचनेला द्वितीय व २०१९ ला 'बळीच्या सरणावरती' गितरचनेला प्रथम क्रमांक व २०२१ ला "तुझ्याविना शेतीनाही" या गितरचनेला द्वितीय क्रमांक तर २०२२ ला 'स्वतंत्र कर तू बापा' व २०२३ ला "अश्रुंच्या बांधावरती" गितरचनेला प्रथम क्रमांक आणि २०२४ ला "कधी जागेल सरकार" शीर्षक असलेल्या
'खर्च वाढला शेतीचा
कर्जात पोसतो ही शेती,
कवडीमोल भावात जाते रे
पिकविलेले हे मोती,
हृदयात सदैव घाव
ओसाड झालिया गावं,
कर्जातच रे संसार
माझ्या शेतीचा बाजार
कधील जागेल सरकार"
या गितरचनेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. रंगनाथ तालवटकर यांना हा पुरस्कार ८ व ९ फेब्रुवारी २०२५ ला कोल्हापूर येथे १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अ.भा.शे. मराठी साहित्य सम्मेलनाचे संस्थापक / अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.कृषीकवी रंगनाथ तालवटकर शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात नुकताच गुजरात गांधीनगर येथे राज्यपाल आचार्यजी देवव्रत यांचे हस्ते राज्यस्तरीय साहित्य कृषीभूषण पुरस्कार मिळाला आहे.
मिळालेल्या यशाबद्दल गंगाधर मुटे,गजानन गिरोलकर, मेघश्याम ढाकरे,विलास नवघरे,अमोल झाडे, गजानन गारघाटे,सहकारी प्रशांत शेवडे, पंकज गाठे,मंगेश वाघमारे,आशिष वरघणे,प्रविण पोहाणे, ग्रामवासी, मित्रपरीवार यांनी अभिनंदन केले.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            