एसएनडीटी महिला विद्यापीठात परीक्षा पे चर्चा कार्यशाळा:परीक्षेच्या तयारीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
 
                                    
                                प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपुर : सध्या परीक्षेचा हंगाम सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये वेळेचे नियोजन, उत्तरलेखन कौशल्य आणि परीक्षेबाबत सकारात्मक दृष्टिकोन यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल येथे परीक्षा पे चर्चा या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन सोमवार ०७ एप्रिल २०२५ ला करण्यात आले.कार्यक्रमात विद्यापीठाच्या विविध विभागांतील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सत्राच्या प्रारंभी सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले की, परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, परीक्षा म्हणजे केवळ ज्ञानाचाच नव्हे, तर नियोजन क्षमतेचाही कस असतो. योग्य वेळापत्रक तयार करून अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा कठीण वाटत नाही. कुठलाही तान न ठेवता अगदी हसत खेळत परीक्षेला सामोरे जा. स्माइल मोर - स्कोर मोर हा संदेश देत बिनधास्तपणे परीक्षा द्या.यानंतर कार्यक्रम समन्वयक डॉ. वेदानंद अल्मस्त यांनी विद्यार्थिनींना अत्यंत उपयुक्त अशा उत्तरलेखन तंत्राचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी फळ्यावर प्रत्यक्ष दाखवत सांगितले की, प्रत्येक प्रश्नाच्या गुणभारानुसार किती लांबीचे उत्तर लिहावे, हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तर जास्त लांब असले म्हणजे ते चांगले आहे असे नव्हे, तर मुद्देसूद आणि योग्य मांडणी असलेले उत्तरच परीक्षकांना प्रभावित करते.आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींना अभ्यासाची दीर्घकालीन दृष्टिकोनातून गरज पटवून दिली.परीक्षा ही केवळ गुण मिळवण्यासाठी नसून आपल्या संपूर्ण करिअरच्या पायाभरणीसाठी असते, त्यामुळे अभ्यासाची सुरुवात पहिल्याच दिवसापासून झाली पाहिजे.सातत्य,संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित आहे,असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विद्यापीठातील सर्व विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षिका वर्ग उपस्थित होते
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            