चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे १ जूनपासून टप्प्याटप्प्याने उघडणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
 
                                    
                                जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे येत्या १ जून २०२५ पासून पाण्याच्या येवा नुसार टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून सुरू झाल्याने आणि पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. बॅरेजमध्ये साठवलेला पाणीसाठा कमी करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे.चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले असून, त्याची एकूण लांबी ६९१ मीटर आहे. यामध्ये १५ मीटर लांब आणि ९ मीटर उंचीचे असे एकूण ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर २०२४ पासून हे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते.सद्यस्थितीत, २७ मे २०२५ रोजी चिचडोह बॅरेजमधील पाणी पातळी १८३.०० मीटर असून, जिवंत साठा ५३.५२ दशलक्ष घनमीटर इतका आहे. या नियोजनानुसार, १ जून २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता प्रकल्पाच्या उभ्या उचल द्वारातून (River Sluice) ८८.०४ क्युमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या खालील भागातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.या वाढत्या पाणी पातळीमुळे कोणतीही जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीलगतच्या सर्व गावांना आणि ग्रामपंचायतींना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.विशेषतः, मार्कंडा देवस्थान येथील नदीवर स्नान करणारे यात्रेकरू, मासेमारी करणारे नागरिक, नदीघाटातून वाळू काढणारे, पशुपालक आणि नदीतून ये-जा करणाऱ्या सर्व जनतेने आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चिचडोह बॅरेज प्रशासनाने केले आहे.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            