रेती चोरी प्रकरणात तिघांना दोन वर्षांसाठी वर्धा जिल्ह्यातून तडीपार

सुनिल हिंगे, ( अल्लीपूर )
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध रेती चोरी प्रकरणात तिघा इसमांना दोन वर्षांसाठी वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत –
▪️ संदेश उमरे (वय 45, रा. शेकापूर)
▪️ शुभम पोहनकर (वय 27, रा. शेकापूर)
▪️ अनिल मांढरे (वय 29, रा. शेकापूर)
या तिघांनी एकत्र येऊन अवैधपणे रेतीची वाहतूक केली होती. तसेच, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकास धमकी देणे व शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते.
या प्रकरणातील पुरावे गोळा करून ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून, पोलीस अधीक्षक अनुराग जैन (वर्धा) यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार तिघांनाही जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस पथकाने कठोर पद्धतीने पार पाडली असून, जिल्ह्यात अवैध रेती तस्करीविरोधात कठोर भूमिका घेण्यात येत आहे.