सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्ड्यांची मालिका – सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?

Fri 25-Jul-2025,10:27 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी – सुनिल हिंगे, अल्लीपूर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर ते शिरूड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात पूर्ण करण्यात आले होते. मात्र, आता या रस्त्यावरच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

अल्लीपूर गावातील बैल बाजार परिसर तसेच शिरूड गावाजवळील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, जे वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी अपघाताचे कारण ठरत आहेत. विशेष म्हणजे या मार्गावरून रोज हजारो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात, तसेच शेतकरी आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते.

अशा महत्त्वाच्या मार्गावर झालेल्या डांबरीकरणाचे काम केवळ सहा महिन्यांतच निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे तर, सुमारे 80 ते 90 मीटरचा टप्पा अजूनही पूर्णतः डांबरीकरणाविना आहे, ज्यामुळे संपूर्ण रस्त्याचा उपयोग धोकादायक बनला आहे.

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार, हा सवाल नागरिक विचारत आहेत.