बल्लारपूर नगर परिषदेची मोकाट जनावरे व भटके कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : शहरातील मुख्य रस्ते, जुने बसस्थानक, रेल्वे चौक, काटागेट परिसरात मोकाट बेवारस जनावरे बसल्याने रहदारीत अडथळा निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारपूर नगर परिषदेने १६ जुलै २०२५ पासून दैनंदिन मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे.जाहिर मुनादी द्वारे जनजागृती करून सुरू झालेल्या या मोहिमेत पकडलेली जनावरे कांजी हाऊस मध्ये ठेवली जात आहेत. ही कारवाई दिवस-रात्र अशा दोन्ही पाळ्यांमध्ये सुरू आहे. नागरिकांनी आपली जनावरे रस्त्यावर फिरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे नगरपरिषदेचे आवाहन आहे.यासोबतच, शहरातील भटके कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे कामही सुरू असून आतापर्यंत १९० कुत्र्यांचे निर्बीजीकरण पूर्ण झाले आहे. मोहिमेदरम्यान पकडलेल्या जनावरांच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिला आहे.