कानगाव व अल्लीपूर मंडळातील समस्या सोडवा- आ.राजेश बकाने यांना शिष्टमंडळाचे निवेदन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील कानगाव, अल्लीपूर मंडळातील ३०० हेक्टर जमीन यशोदा नदीच्या पुरामुळे चौथ्यांदा पाण्याखाली गेली. त्या शेतीचे फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी आ. राजेश बकाने यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निमसडा, टाकळी (दरणे), अलमडोह, गाडेगाव, सोनेगाव, पवनी, चाणकी, भगवा, मनसावळी, कान्होली (कात्री) या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी निष्पक्ष सर्व्हे न केल्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे पुन्हा फेरसरव्हे करुन पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गाडेगाव ते चाणकी, कोसुर्ला ते भैयापूर, वरूड, साती आदी भागांतील पूल अतिवृष्टीत वाहून गेल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. ती सुरळीत करावी व गाडेगाव ते वर्धा ही सायंकाळी परतीच्या प्रवासाची बस सुरू करावी, रोहनखेडा ते चाणकीपर्यंत नाला खोलीकरण करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सर्व समस्यांचा गांभिर्याने विचार करून तत्काळ मदत करू असे आश्वासन आ. राजेश बकाने यांनी दिले. यावेळी कानगाव येथील किसान आघाडीचे मंडळ अध्यक्ष त्र्यंबक तळवेकर, माजी पं.स. सदस्य गौतम फुलमाळी, गुणवंत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राजू गिरी उपस्थित होते.