वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा प्रभारींच्या उपस्थितीत पार पडली

Tue 23-Sep-2025,10:09 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा : दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा मुख्यालयातील इंदिरा सद्भावना भवन येथे संपन्न झाली. काँग्रेस संघटन अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत वर्धा जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी आमदार व मंत्री राजेंद्रजी मुळक तसेच रणजीत कांबळे (वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विधानसभा मतदारसंघ प्रभारी सुरेश भोयर (देवळी), अतुल कोटेचा (वर्धा), अनिल गायकवाड (आर्वी), संजय वानखेडे (हिंगणघाट), नगराध्यक्ष शेखरभाऊ शेंडे, संदेश सिंगलकर (सरचिटणीस म.प्र.काँ.क), अभ्युदय मेघे (सचिव म.प्र.काँ.क), राष्ट्रीय समन्वयक शैलेशजी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले. त्यांनी ब्लॉकनिहाय संघटनात्मक आढावा सादर करून पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. सर्व ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी आपल्या कार्यकारिणीचा अहवाल मांडत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे सांगितले.

बैठकीत जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट करण्याबरोबरच कार्यकर्त्यांची जबाबदारी, बूथ लेव्हल बांधणी, नवीन बी.एल.ए. तयार करणे व मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती यावर सखोल चर्चा झाली.

यावेळी राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांना एकजूट राहून जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. तर रणजीत कांबळे यांनी बूथ लेव्हल संघटन मजबूत करण्याच्या सूचना देत, काँग्रेस पक्ष समाजहितासाठी सदैव लढत राहील असा विश्वास व्यक्त केला.

बैठकीदरम्यान अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काहींना पक्षपदाची नेमणूक करून नियुक्तिपत्र देण्यात आले.

या बैठकीला वर्धा जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, महिला-पुरुष कार्यकर्ते व सेल अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.