दुर्गाअष्टमी निमित्ताने बोरी ते पारडसिंगा पायदळ दिंडी यात्रा – भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग

Wed 01-Oct-2025,02:40 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा/कारंजा घाडगे : दुर्गाअष्टमीच्या पावन निमित्ताने बोरी येथून पारडसिंगा अनुसया माता देवस्थानापर्यंत २२ किलोमीटरची पायदळ दिंडी यात्रा मंगळवारी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. या वारीचे आयोजन बोरी येथील चंद्रभानजी बारंगे यांनी केले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी सुरू केलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली.

सकाळी नेमक्या ७ वाजता बोरी गावातून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. गावफेरी करून, भजनाच्या गजरात, बोरी ते काटोल मार्गे सुमारे २०० हून अधिक भक्तांनी सहभागी होत दिंडी पुढे सरकली. यामध्ये गावकरी, महिला भजन मंडळ तसेच विविध भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यात्रेच्या दरम्यान धर्ती मुर्ती, पारडी वलणी, खाणगाव आदी ठिकाणी भक्तांची सेवा करण्यासाठी नाश्ता, चहा-पाण्याची सोय करण्यात आली होती. या वारीत सामाजिक कार्यकर्ते रोशन वरठी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सायंकाळी नेमक्या ७ वाजता पालखी पारडसिंगा अनुसया माता देवस्थान येथे पोहोचली. येथे आरती-पूजन करून सर्व भक्तांनी दर्शन घेतले आणि भक्तिभावाने ही पवित्र वारी संपन्न झाली.