नगर परिषद निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: आगामी बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने मतदार प्रारूप याद्यांच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. या नव्या कार्यक्रमानुसार नागरिकांना १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयातून १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नगर परिषद कार्यालयात तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसार हरकती व सूचना ८ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान स्वीकारल्या जाणार होत्या. मात्र आयोगाच्या नव्या निर्देशांनुसार हा कालावधी वाढवून ८ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ असा करण्यात आला आहे. नागरिकांनी आपले नाव, पत्ता किंवा इतर दुरुस्तीसाठी संबंधित मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांच्या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यानंतर प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती नगर परिषद बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिली आहे.या सुधारीत कार्यक्रमामुळे मतदारांना आपले नाव योग्य प्रकारे नोंदवण्यासाठी व दुरुस्तीसाठी अतिरिक्त वेळ मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.