१६ ऑक्टोबरला " धम्मचक्र अनुवर्तन दिना " निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर करा : खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रशासनाला ठाम मागणी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर :- रक्ताचा एकही थेंब न सांडता चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर महामानवाच्या एका शब्दावर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा दिन चंद्रपूर शहराच्या इतिहासात एक अविस्मरणीय क्षण म्हणून नोंदविला गेला यानिमित्ताने दरवर्षी बौद्ध अनुयायांना दीक्षाभूमीवर अस्थीकलशचे दर्शन घेता यावे म्हणून जिल्हाधिकारी सुट्टी घोषित करायचे मात्र यावर्षी नकळतपणे की हेतूपूरसर सुट्टी घोषित केली गेली नाही या अनुषंगाने चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू केला होता. तथापि, या दिवशी सार्वजनिक सुट्टी नसल्याने लाखो अनुयायांच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांना धक्का पोहोचत असल्याचे कारण देत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे १६ ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची ठाम मागणी केली आहे. हा विषय लाखो लोकांच्या श्रद्धा आणि सामाजिक भावनांशी निगडीत आहे. त्यामुळे प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून या ऐतिहासिक दिवसाला सार्वजनिक सुट्टी घोषित करावी, अशी आग्रही मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, दरवर्षी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी चंद्रपूर दीक्षाभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. हा दिवस सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा प्रतीक असून, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना तसेच विविध आस्थापनांतील कामगारांना त्या दिवशी रजा मिळवणे कठीण जाते. त्यामुळे अनेकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होता येत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्यास, लाखो अनुयायांना शांततेत व उत्साहाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करता येईल, असा विश्वास खासदार धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.