दिव्यांगांच्या पेन्शनमधील अनियमिततेविरोधात हक्क संघर्ष समितीचा आवाज : बल्लारपूर तहसील कार्यालयात निवेदन सादर

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : दिव्यांग जनांवरील अन्यायाविरोधात दिव्यांग हक्क संघर्ष समितीच्या वतीने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालय, बल्लारपूर येथे आंदोलन करून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
अलीकडेच राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या पेन्शनमध्ये वाढ करून ती रक्कम २ हजार ५०० रुपये इतकी केली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात पहिली किस्त जमा झाल्यावर अनेक दिव्यांग बांधवांच्या खात्यात अद्यापही फक्त १ हजार ५०० रुपये इतकीच रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. ही बाब दिव्यांगांवर झालेल्या अन्यायासमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समितीने या त्रुटीची सखोल चौकशी करून उर्वरित १ हजार रुपये रक्कम तातडीने दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.
अशा प्रकारच्या समस्या जिल्हाभर दिसून येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच, या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे आसीफ हुसेन शेख यांनी सांगितले.
ते म्हणाले की, डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) सुविधा सुरू झाल्यापासून अनेक दिव्यांगांना त्यांच्या आर्थिक हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
निवेदन सादर करताना विकास भगत, राजकुमार रामटेके, उमरे काका, सुरेश केशकर, राज नारायण यादव, बादल वानखेडे, अरविंद भीमटे, मोडक काका, वाळके, गुणवंत धांधरे, नगराले आदी उपस्थित होते.