नगरपरिषद निवडणुकीतील गंभीर गैरव्यवस्थेबाबत आप ची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तातडीच्या चौकशीची मागणी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे शहराध्यक्ष रविकुमार शं. पुप्पलवार यांनी मा. जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना विस्तृत लेखी निवेदन सादर केले. नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या अभूतपूर्व गैरव्यवस्था, मतदारांच्या नावांतील विसंगती, मतदारयादी अद्ययावत न करणे, पैशांचे वाटप आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात कडक आणि तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवडणुकीत उघड झालेले गंभीर मुद्दे
1. शेकडो मतदारांना त्यांच्या वास्तव प्रभागापेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रभागात नावे नोंदविणे, ज्यामुळे नागरिकांना मतदान करता आले नाही.
2. Voter ID असूनही नाव मतदारयादीत नसणे, अद्ययावत प्रक्रिया ढिसाळपणे झाल्याचे स्पष्ट.
3. दुबार नाव दाखवून मतदारांना मतदानाचा हक्क नाकारणे, हा सरळ लोकशाहीवरील प्रहार.
4. बीएलओ व निवडणूक अधिकाऱ्यांनी घर-घर जाऊन पडताळणी न करणे, विनंती करूनही दुर्लक्ष.
5.काही प्रभागांत उघडपणे पैशांचे वाटप, व्हिडिओ पुरावे प्रशासनाला दिले तरी कोणतीही कारवाई नाही.
6. QR कोड व वेबसाईटवरील माहिती त्रुटीपूर्ण, ऑनलाइन नाव दिसत असले तरी बुथवर हजर असताना नाव गायब.
आम आदमी पार्टीची प्रमुख मागणी
उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि तातडीची चौकशी
गैरव्यवस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई
मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी कठोर निर्देश
भविष्यातील निवडणुकीत पारदर्शक प्रणाली लागू करणे
बहुसंख्य नागरिकांना मतदान करता न आल्याने आवश्यक असल्यास विशेष पुनर्विचार प्रक्रिया सुरू करणे
पुढील निवडणूक प्रक्रियेत प्रतिनिधींना बुथवर बसण्यासाठी स्पष्ट व पारदर्शक व्यवस्था
आम आदमी पार्टीचे विधान
“या निवडणुकीत झालेली गैरव्यवस्था ही लोकशाहीवरील थेट आघात आहे. नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. अन्यथा आम्ही न्यायालयीन मार्ग अवलंबण्यास बाध्य होऊ,” असे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी नमूद केले.