निरोगी समाजासाठी स्नेह व सदाचार आवश्यक – पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : वर्धा शहरात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन सहजपणे घडते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव आजही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात दिसून येतो. म्हणूनच वर्धा शहराला सर्वधर्म समभावाचे तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते.
आजच्या भीतीयुक्त व अविश्वासाच्या वातावरणात एकमेकांवर विश्वास निर्माण करण्याची नितांत गरज आहे. विश्वासातूनच माणसे एकमेकांच्या जवळ येतात आणि भीती कमी होते. निरोगी समाजजीवनासाठी आपुलकीची भावना, कर्तव्यनिष्ठा, सकारात्मक दृष्टिकोन, स्नेह व सदाचार अत्यंत आवश्यक आहेत, असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात सदिच्छा भेटीस आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी साहित्यिक इमरान राही, सत्याश्रम मंडळाचे अध्यक्ष विजय सत्यम (वर्धा), ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू लभाणे, गोदावरी मोहिते बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धाचे अध्यक्ष प्रा. मोहन मोहिते तसेच लॉयन्स कराटे-डो असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास वाघ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी इमरान राही यांनी आपला तिसरा काव्यसंग्रह ‘कलाम-ए-राही’ तर विजय सत्यम यांनी स्वामी सत्यभक्त यांची पुस्तके भेट स्वरूपात दिली.