लिंगा गावचे सुपुत्र दीपक बाबुराव नासरे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून दणदणीत विजय
प्रतिनिधी योगेश नारनवरे नागपुर
नागपुर:वानडोगरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून लिंगा गावचे सुपुत्र दीपक बाबुराव नासरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत भरघोस मतांनी विजय संपादन केला. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे लिंगा गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे.
एका छोट्याशा गावातून आलेल्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीने थेट नगरपरिषदेत प्रवेश करत अपक्ष म्हणून विजय मिळवणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब ठरत आहे. दीपक नासरे यांनी आपल्या सामाजिक जीवनात अनेक लोकहिताच्या आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. गरीब, वंचित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेत सत्ताधारी व प्रभावशाली व्यक्तींविरोधातही आवाज उठवला आहे.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मनसे पक्षापासून झाली. सुरुवातीपासूनच त्यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका घेतली. प्रभागातील दारूची दुकाने बंद करण्यासाठी केलेले आंदोलन, तसेच रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.
आज त्यांच्या विजयामुळे लिंगा गावाचा नावलौकिक वाढला असून “गरीबाचा आवाज नगरपरिषदेत पोहोचला” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे लिंगा गावातील कोणताही नागरिक वानडोगरी येथे कोणत्याही कामासाठी गेला, तर दीपक नासरे हे धावून जाऊन मदत करतात, अशी सर्वसामान्यांमध्ये ठाम धारणा आहे.
दीपक नासरे यांची ही निवडणूक विजयगाथा तरुण पिढी, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य जनतेसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
बॉक्स
“सर्वप्रथम हा विजय मी स्वर्गीय बाबुरावजी नासरे यांच्या चरणी समर्पित करतो. वानडोगरी प्रभाग क्रमांक ८ मधील सर्व मतदार बांधवांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच वानडोगरी शहरातील सर्व नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्याबद्दल मी ऋणी आहे. जनतेने दिलेल्या या संधीचे सोने करीत प्रभागाच्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन, ही ग्वाही
दीपक बाबुराव नासरे,नगरसेवक वानडोगरी