बल्लारपूर नगरपरिषदेतील विविध समित्यांचे सभापती व स्थायी समिती सदस्य बिनविरोध निवड
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर नगरपरिषदेची विशेष सभा मंगळवार २० जानेवारी २०२६ रोजी राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे पार पडली. पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत सभापती व स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली.
या विशेष सभेत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांची स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अब्दुल करीम शेख, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी इस्माईल ढाकवाला, विकास व नियोजन समितीच्या सभापतीपदी पवन मेश्राम, शिक्षण समितीच्या सभापतीपदी प्रियंका थुलकर तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मेघा भाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याचबरोबर माजी नगराध्यक्ष छाया मडावी, लखनसिंग चंदेल व करुणा नरसिंह रेब्बावर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. नगराध्यक्ष अलका अनिल वाढई, उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य, मुख्याधिकारी विशाल वाघ तसेच विशेष सभेला उपस्थित सर्व नगरपरिषद सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती व स्थायी समिती सदस्यांचे अभिनंदन केले.