स्वच्छ भारत’ केवळ फलकांपुरतेच; हिंगणघाट शहरात सार्वजनिक शौचालयांचा तीव्र अभाव
‘स्वच्छ भारत’ केवळ फलकांपुरतेच; हिंगणघाट शहरात सार्वजनिक शौचालयांचा तीव्र अभाव
हिंगणघाट | प्रतिनिधी : नदीम शेख
हिंगणघाट शहरात विकासकामे वेगाने सुरू असली तरी मूलभूत स्वच्छता सुविधांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. शहरात भव्य प्रवेशद्वारे, रस्त्यांचे सुशोभीकरण व विविध विकासकामे होत असतानाच अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था मात्र पूर्णतः अपुरी ठरत आहे.
दररोज शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून हजारो नागरिक विविध कामांसाठी हिंगणघाटमध्ये येत असतात. लाखोंच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरात सार्वजनिक शौचालयांची तीव्र कमतरता जाणवत आहे. विशेष म्हणजे बसस्थानकापासून आंबेडकर चौक, आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय, तहसील कार्यालय ते संत तुकडोजी महाराज पुतळा तसेच सुभाष चौकापर्यंत एकही सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही.
शौचालयांची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेक वेळा मजबुरीने उघड्यावर शौच करावे लागत आहे. परिणामी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही भाग तर आता ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. नगर परिषदेमागील शाळेजवळील परिसर, आंबेडकर चौक स्मारकामागील भाग, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ, स्टेट बँकेजवळ, जुना ताराबाई दवाखाना परिसर, कारंजा चौकातील मुंधडा गल्ली तसेच विठोबा चौक परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून तेथे थांबणेही कठीण झाले आहे.
या समस्या शहरातील नागरिकांना चांगल्याच माहीत असून अनेक वर्षांपासून सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहराची स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्याची जोरदार मागणी होत आहे.