पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते वातानुकूलित वाचनालयांचे उद्घाटन

Tue 27-Jan-2026,06:47 AM IST -07:00
Beach Activities

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते वातानुकूलित वाचनालयांचे उद्घाटन

वर्धा जिल्हा विशष प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा नगर परिषद क्षेत्रात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक १६, १८ व १९ मध्ये प्रत्येकी ३१ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वातानुकूलित वाचनालयांचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्याधिकारी विजय देशमुख, नगर परिषदेच्या बांधकाम सभापती राखी पांडे, शिक्षण सभापती प्रियंका खंगार तसेच संबंधित प्रभागातील नगरसेवक उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या “वाचाल तर वाचाल” या संदेशाचा अंगीकार करून मागास वस्तीतील युवक व नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती निर्माण व्हावी, युवकांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने नगर परिषद क्षेत्रात एकूण ८ वातानुकूलित वाचनालये उभारण्यात येत आहेत. यापैकी तीन वाचनालये आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील उद्घाटनप्रसंगी दिली.

या वाचनालयांच्या परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच वाचनालयांची देखभाल व परिसराची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही डॉ. भोयर यांनी केले.

नगर परिषद क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रत्येकी ३१ लाख रुपये खर्चाचे एकूण ८ वातानुकूलित वाचनालयांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी तीन वाचनालये सुरू करण्यात आली असून, उर्वरित तीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. उरलेल्या दोन वाचनालयांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांचेही उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी दिली.

यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते तिवारी ले-आऊट येथील प्रभाग क्रमांक १६, अशोक नगर येथील प्रभाग क्रमांक १८ व पुलफैल येथील प्रभाग क्रमांक १९ मध्ये उभारण्यात आलेल्या वाचनालयांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास संबंधित प्रभागातील नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.