जी. प. उच्च प्राथमिक शाळा काचनगावच्या विद्यार्थ्यांनी घेतला वनभोजनाचा मनमुराद आनंद

Sat 07-Feb-2026,05:28 AM IST -07:00
Beach Activities

जी. प. उच्च प्राथमिक शाळा काचनगावच्या विद्यार्थ्यांनी घेतला वनभोजनाचा मनमुराद आनंद

 

तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर

 

हिंगणघाट तालुक्यातील जी. प. उच्च प्राथमिक शाळा काचनगावच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. ०५/०२/२०२६ रोजी गावालगत असलेल्या रामेशराव डफ यांच्या शेतातील शिवमंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेच्या वतीने एकत्रितपणे वनभोजनाचा आनंद घेतला.

निसर्गसंपन्न वातावरणात विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस नाच-गाणे, खेळ आणि विविध उपक्रमांत रमून घालवला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या भाजीपाला, धान्य व इतर साहित्याची माहिती घेतली. तसेच विविध पाककृती कशा तयार केल्या जातात, याची प्रत्यक्ष माहिती करून घेत वनभोजनासाठी स्वयंपाक करणाऱ्या महिलांना मदत केली.

सकाळपासूनच निसर्गाच्या सान्निध्यात राहून विद्यार्थ्यांनी स्वयंपाकातील विविध कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भोजन तयार झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करून परिसराची साफसफाईही करण्यात आली.

निसर्गात घालवलेला हा एक दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी व ज्ञानवर्धक ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व समजले तसेच प्रत्यक्ष अनुभूतीतून शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ज्ञानरचनावादावर आधारित या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मोघे सर, काकडे सर, धुर्वे सर, मांढरे सर, शाळा व्यवस्थापन समिती, मित्रमंडळी, सर्व शिक्षकवृंद व पालकांचे उत्तम नियोजन व सहकार्य लाभले.