खासदार अमर काळे यांनी संसदेत बुलंद केला वर्धा लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रश्नांचा आवाज
खासदार अमर काळे यांनी संसदेत बुलंद केला वर्धा लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रश्नांचा आवाज
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण
नवी दिल्ली सध्या नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन-२०२६ दरम्यान वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत सक्रिय सहभाग घेत वर्धा जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे मतदारसंघातील रेल्वे सुविधांबाबत ठोस व आग्रही मागण्या मांडल्या.
तसेच, खासदार काळे यांनी देशाचे संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पुलगाव व आमला येथील महत्त्वाच्या मिलिटरी डेपोना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाबाबत सविस्तर निवेदन सादर केले. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पाला लवकरात लवकर मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली.
संसदेत मांडलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
१) पुलगाव-आर्वी-वरुड नवीन रेल्वे मार्ग
पुलगाव ते आर्वी या जुन्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पुलगाव व आमला येथील मिलिटरी डेपोना जोडण्यासाठी आर्वी ते वरुड या नवीन रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली.
२) बंद पडलेले रेल्वे थांबे पुन्हा सुरू करणे
कोरोना काळात बंद करण्यात आलेले वर्धा लोकसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे रेल्वे थांबे अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व थांबे तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली.
३) रखडलेले ओव्हरब्रिज व अंडरपास
मतदारसंघात अनेक ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) व अंडरपासची कामे संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी रखडलेली आहेत. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
“मी २०२४ पासून सातत्याने रेल्वे मंत्र्यांकडे या प्रश्नांचा पाठपुरावा करत आहे. वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हे प्रश्न लवकर निकाली निघणे अत्यंत आवश्यक आहे. रेल्वे मंत्रालयाने याकडे विशेष लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी खासदार अमर काळे यांनी यावेळी केली.