आमदार संतोष बांगर यांना मंत्रीपदाची मागणी; औंढा परिसरात जोरदार चर्चा
प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक व लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मागणी औंढा नागनाथ परिसरातून जोर धरू लागली आहे. राज्यात संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आमदार बांगर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
औंढा नगराध्यक्ष कपिल खंदारे यांनी आमदार संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळाल्यास हिंगोली जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, संतोष बांगर यांनी हिंगोली, कळमनुरी आणि औंढा नागनाथ मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढवला आहे.
सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता, विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क यामुळे आमदार बांगर यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आलेला असताना आमदार संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरही आमदार संतोष बांगर यांच्या संभाव्य मंत्रीपदाबाबत विविध पोस्ट आणि चर्चांना उधाण आले असून शिवसैनिक व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.