दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; वाहन जप्त
दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; वाहन जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी वर्धा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी व विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान वर्धा शहरातील इतवारा चौक येथे मार्शल पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अनिल तिवारी, दिलीप कामडी व प्रदीप कोहळे यांनी एमएच-३२ एपी-५९९० क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. वाहन चालक अमोल लक्ष्मणराव धुर्वे (वय ३६, रा. पढेगाव, ता. वर्धा) हा दारूच्या नशेत वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले.
सदर चालकास वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणून ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याच्या शरीरात १९१.३ मिलीग्रॅम टक्के अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. यानंतर चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा नोंदवून वाहन जप्त करण्यात आले. तसेच वाहन चालकाचा परवाना जप्त करून मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९ अन्वये परवाना निलंबनासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या एकूण १५१ कारवाया करण्यात आल्या असून ४७ वाहनचालकांच्या परवाना निलंबनाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर १,२०२ कारवाया तर अवैध प्रवासी वाहतुकीच्या ९३ प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली आहे.
वाहनचालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट लावावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.