बामणी ब्रीजमुळे शिवनगरवासीय संकटात! तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर चंद्रपूर दि: ०३ जुलाई २०२५ बामणी टी-पॉईंट येथील ब्रीज बांधकामामुळे बामणी ग्रामीणच्या शिवनगर वार्डातील नागरिकांचे जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. अपुरे नियोजन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील रहिवाशांना दररोज चिखल, खड्डे, अंधार आणि अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या सदर्भात संबंधित प्रशासनाचे अधिकारी, ठेकेदार व आम आदमी पार्टी सह परिसरातील नागरिकांची सभा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. या सभेत संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि आम आदमी पार्टीने प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
प्रमुख समस्या :
ब्रीजचे काम सुरू करताना शिवनगर वार्डातील सुमारे २५०-३०० लोकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही, प्रशासनाने यात दिरंगाई केली आहे.- जुना रस्ता अवजड वाहनांच्या वापरामुळे चिखलाने भरला आहे आणि खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना ये-जा करताना प्रचंड अडचणी येत असून, रोज अपघात घडत आहेत.- रात्रीच्या वेळी रस्त्यावर प्रकाश व्यवस्था नसल्याने अपघात वाढले आहेत. तसेच,जंगली प्राण्यांच्या हल्ल्याची भीती वाढली असून,नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. ब्रीज कामामुळे काढलेले दिवे त्वरित पूर्ववत करण्याची मागणी आहे.शिवनगर वार्डातील काही घरकुल मंजूर होऊनही रद्द का करण्यात आले व तसेच रस्ते, नाली, पिण्याचे पाणी आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा का आतापर्यंत उपलब्ध नाहीत, याचीही लेखी माहिती मागितली आहे.- शिवनगर वार्डासाठी तातडीने सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा.- जोपर्यंत पर्यायी मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत सध्याच्या धोकादायक रस्त्याची पीसीसी (PCC) करून चुरी टाकून तातडीने दुरुस्ती करावी.- कामाच्या ठिकाणी आणि पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करून अवजड वाहनांना सध्याच्या मार्गावरून तत्काळ बंद करावे.रात्रीच्या वेळी अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वन्यप्राण्यांपासून सुरक्षिततेसाठी रस्त्यावर तातडीने पुरेसे प्रकाश देणारे दिवे लावावेत.- घरकुल रद्द करण्यामागचे कारण आणि मूलभूत सुविधांच्या अभावाची लेखी माहिती २ दिवसांच्या आत देण्यात यावी.या सर्व मागण्या १० दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, आम आदमी पार्टी आणि शिवनगर वार्डातील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील. जोपर्यंत नागरिकांना सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ब्रीजचे काम बंद ठेवण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष रविकुमार शं.पुप्पलवार यांनी दिला आहे. या परिस्थितीस सभेत उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, एनएचएआय (NHAI), एमएसईडीसीएल (MSEDCL), ग्रामपंचायत, ठेकेदार आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.या आंदोलनाची पूर्वसूचना बल्लारपूर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.