शेतकरी सन्मान निधी हप्त्याच्या प्रतीक्षेत पाच महिने लोटूनही निधीचा पत्ता नाही

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :- शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे सुरू असलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनाचे अनुक्रमे २०वा आणि ७ वा हप्ता वितरित होण्यास विलंब झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम सुरू असतानाही पाच महिने लोटूनही गेले तरीही हा निधी त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यात नाराजीचा सूर आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासन दरवर्षी ६ हजार रुपये तर राज्य शासन नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत ६ हजार रुपये अशी एकूण १२ हजार रुपये मदत चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी ४हजार रुपये च्या तीन हप्त्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करत असते. या योजनेचा शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जमा झाला होता. त्यानंतर तब्बल पाच महिने उलटूनही जुलै महिना संपत आला आहे. तरीही केंद्राचा २०वा आणि राज्याचा ७वा हप्ता वितरित झाला नाही. परिणामी खरीप पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना बी बियाणे,खते, औषधी,घरगुती खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा भार पेलताना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही योजना मधून मिळणाऱ्या निधीचा शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा आधार मिळतो.
तात्काळ हप्ते वितरित करा
भाग्यवान कामथे मनसे तालुका अध्यक्ष
मागील महिन्याच्या अखेरीस हप्ता जमा होईल अशा अशा शेतकऱ्यात निर्माण झाली होती. मात्र ते महिने निघून गेलेत. आता जुलै महिना संपत आल्याच्या मार्गावर असताना सरकारने अद्याप निधी वितरित केलेला नाही. त्यामुळे शासनाचे लाभार्थी शेतकरी चातकासारखे या पैशाची वाट पाहत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत असून शासनाने तात्काळ हप्ता वितरित करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा. अशी मागणी आता मनसे व शेतकऱ्याकडून होऊ लागली आहे.