अस्वलीच्या हल्ल्यात पिता-पुत्र गंभीर जखमी

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर: बल्लारपूर तालुक्यत जुनोना येथील बेघर भागात शनिवारी घडलेल्या भीषण घटनेत अस्वलीच्या हल्ल्यात अरुण कुकसे (६५) गंभीर जखमी झाले. वडिलांना अस्वलीच्या तावडीतून सोडविण्यास गेलेला त्यांचा मुलगा विजय कुकसे हाही गंभीर जखमी झाला आहे. वडील अरुण कुकसे हे गंभीर गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.स्थानिकांच्या माहितीनुसार, अरुण कुकसे यांच्यावर अस्वलीने झडप घालत त्यांना घट्ट पकडले होते. वडिलांना वाचवण्यासाठी विजय कुकसे यांनी धाव घेतली असता त्यालाही अस्वलीने चावा घेत गंभीर जखमी केले. त्या प्रसंगी गावकऱ्यांनी मोठा धैर्य दाखवत दगड-काठ्या फेकून अस्वलीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अस्वलीलाही गंभीर दुखापत झाली.वन विभागाला घटनेची माहिती मिळताच तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले. या बचाव मोहिमेत हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे, वनविकास महामंडळाचे कदम, जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन पोडसेलवार तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी घोरपडे यांनी समन्वय साधत यशस्वीरीत्या बचाव कार्य पूर्ण केले.जखमी अस्वलीला आवश्यक ती प्राथमिक उपचार सुविधा पुरवून पुढील उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे हलविण्यात आले आहे. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अस्वलीच्या हालचालींवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.दरम्यान, या घटनेमुळे जुनोना व आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वारंवार होणाऱ्या अस्वलींच्या वावरावर नियंत्रण आणावे व लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.